जालना : वृत्तसंस्था
माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रात सरकार राहील का ? येथे दुसरी श्रीलंका दिसेल, असा इशारा देत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी रात्री त्यांनी अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी माध्यमांशी संवाद साधला, जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.
अध्यादेशाची अंमलबजावणी करणे सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकमेकांवर ढकलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही देणे-घेणे नाही. ते भुजबळांना बळ देताहेत. केसेस मागे घ्या म्हटले तरी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. हैदराबादचे गॅझेट घ्या म्हटले तर ते घेतले जात नाही. शिंदे यांच्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या म्हटले तर दोन महिन्यांची दिली. आजवर शिंदे समितीने काय केले? मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अद्याप स्वीकारला नाही, असे आरोप त्यांनी यावेळी केले.