ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“तुझी लय दहशत झाली, महिला तहसीलदाराला धक्काबुक्की !

टेंभुर्णी : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास टेंभुर्णीजवळ वाळूमाफियांनी कुर्डूवाडीच्या तहसीलदार प्रियांका आंबेकर (ठोकळ) यांना “तुझी लय दहशत झाली आहे. तू माझ्याच खड्ड्यावरील वाळूच्या गाड्या का धरतेस?’ असे म्हणत धक्काबुक्की करत पकडलेला वाळूचा टिप्पर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अण्णा पाटील (रा. शिराळ ,ता. माढा), अप्पा पराडे (रा. बाभळगाव, ता. माळशिरस) या संशयित वाळूमाफियांसह गणेश सोमनाथ काशीद ( रा. परितेवाडी, ता.माढा) या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २० लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या घटनेमुळे भीमा नदीकाठी वाळूमाफियांची दहशत उघड झाली आहे.

याप्रकरणी कुर्डूवाडीचे महसूल अधिकारी प्रवीण किसन बोटे यांनी फिर्याद दिली. प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर या पथकासह गस्त घालत होत्या. उजनी(मा)-वरवडे-टेंभुर्णीकडे येताना गुरुवारी मध्यरात्री वरवडे टोल नाक्याजवळ विनानंबर वाळूचा टिप्पर पाठलाग करून त्यांनी थांबवला. त्या वेळी चालक गणेश सोमनाथ काशीदला टिप्पर सोडून पळताना पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडले. चौकशी केली असता अप्पा पराडे यांचा टिप्पर असून त्यातील वाळू अण्णा पाटील यांच्या शिराळ (टे.) येथील खड्ड्यावरून आणल्याचे त्याने सांगितले.

यानंतर टिप्पर पोलिस स्टेशनकडे नेताना एक पांढऱ्या रंगाची कार आली. त्यातील व्यक्तीने टिप्परला थांबण्याचा इशारा केला. वाहने न थांबवल्यामुळे पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर (एमएच ४२ बी ३३९६) गाडी आडवी लावण्यात आली. त्यानंतर अण्णा पाटील व अप्पा पराडे यांनी “तुझी दहशत लय झाली आहे, तू माझ्याच खड्ड्यावरील वाळूच्या गाड्या अडवतेस. माझ्याच खड्ड्यावर कारवाई करता काय?’ असे म्हणत आंबेकर यांना धक्काबुक्की केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!