---Advertisement---

आमदार भारत भालके यांचे निधन ; सोलापूर जिल्ह्याला आणखी एक धक्का

Follow Us:
---Advertisement---

 

पंढरपूर, दि.२८ : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रुबी रुग्णालयात गेले होते.
ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली.
आमदार भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. २०१९ साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुली असा परिवार आहे. मुळ गावी सरकोली येथे त्यांच्यावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान आ.भारत भालके यांच्या निधनानंतर संपूर्ण मतदारसंघात शोककळा पसरली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!