पुणेः योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन झाले आहे ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
बालाजी तांबे यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनील, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे यांनी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातूनही आयुर्वेदाचा प्रसार केला. सोप्या भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहे. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले.
बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातील आणि अभियांत्रिकीमधील पदवी एकाच वर्षी मिळली होती. तसंच, त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावरही संशोधन केलं होतं. हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ डॉ. बालाजी तांबे कार्यरत होते.