पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ; विकास कामांना निधी कमी पडणार नाही- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
सोलापूर, दि.26 (जिमाका) :- शहरात महापालिकेची विकास कामे सुरू आहेत. विकास कामांना भरघोस निधी दिला जाईल. निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शासनाच्या विविध योजनेंतर्गत सोलापूर शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री. भरणे यांनी प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन कोरोना संकट दूर होऊन मोकळे वातावरण तयार होऊ दे, अशी प्रार्थना केली. आघाडी शासनाचे धोरण संकट काळात गोरगरीब जनतेला मदत करण्याचे आहे. प्रत्येकांनी वाद-विवाद टाळून विकासाची कामे करावीत. प्रत्येक विकास कामाला निधी दिला जाईल. काजलनगर येथील उद्यान लहान बालके, वृद्धांना महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गटनेते महेश कोठे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, नगरसेवक तौफिक शेख, बाबा मिस्त्री, संतोष पवार, किसन जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
विजापूर रोड येथील प्रभाग क्रमांक 22 मध्ये पद्मभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार भूमीपूजन आणि दलितमित्र डी.व्ही. फडतरे यांच्या नावाने चौकाचे नामकरण फीत कापून श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका पूनम बनसोडे, अजित बनसोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
- पैशाचा उपयोग सामाजिक कामासाठी व्हावा – पालकमंत्री
यानंतर तुळजापूर नाका येथील रूपा भवानी स्मशानभूमीत इलेक्ट्रीक विद्युत दाहिनीचे लोकार्पण श्री. भरणे यांच्या हस्ते झाले. या विद्युत दाहिनीचे काम बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांनी सीएसआर निधीमधून केले आहे. यानिमित्त पालकमंत्री श्री. भरणे यांनी सामाजिक कामाबद्दल श्री. रेड्डी यांचे कौतुक करून सन्मान केला. श्री. भरणे यांनी सांगितले की, दानशूरांनी पैशाचा उपयोग सामाजिक कामे, नागरिकांच्या मदतीसाठी करावा.
यावेळी श्री. रेड्डी यांनी स्मशानभूमीची निगा राखण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाला महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक महेश कोठे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, संतोष पवार, किसन जाधव यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे उपस्थित होते.
- जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता नाही
कोरोना महामारीत कोणत्याही रूग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी शासनाने घेतली आहे. जिल्ह्यात 190 मेट्रीक टन शासकीय आणि खाजगी प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. लागणाऱ्या ऑक्सिजनच्या तिप्पट ऑक्सिजन आपल्याकडे असल्याने कोणतीही कमतरता नाही, असे आश्वस्तही श्री. भरणे यांनी केले.
बार्शी रोडवरील भोगाव खत डेपो येथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटच्या उदघाटनप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. हा प्लांट जिल्हा वार्षिक योजनेतून साकारला गेला आहे. याठिकाणी दोन प्लांट असून यांची क्षमता 20 किलोलिटर एवढी आहे. या कार्यक्रमाला महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक महेश कोठे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, संतोष पवार, किसन जाधव यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे उपस्थित होते.