कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तीर्थक्षेत्र अक्कलकोट व सोलापूर बाबत केलेल्या व्टिटबाबत अक्कलकोटकरांनी दिली तीव्र तिखट प्रतिक्रिया, म्हणाले.. ‘नावू कन्नड भाषिक ईद्देऊ आदर नमग महाराष्ट्रनागे इरादू आद’
अक्कलकोट, दि.24 : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तीर्थक्षेत्र अक्कलकोट व सोलापूर बाबत केलेल्या व्टिटबाबत अक्कलकोटकरांनी तीव्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ‘नावू कन्नड भाषिक ईद्देऊ आदर नमग महाराष्ट्रनागे इरादू आद’, नवू महाराष्ट्रानागे हुट्टीदेऊ नम्म सावू महाराष्ट्रदागे आगे बेकू’ नम्मगे कर्नाटकदाग होगादु इच्छे इल्ला. कर्नाटक राज्यात सोलापूरसह अक्कलकोट तालुका मागण्याचा कोणी विचार केल्यास आम्ही प्राणपणाने विरोध करुन अशी तीव्र प्रतिक्रिया अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी शहरासह तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या 40 गावांवर दावा करणार असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद पेटला. दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकही गाव देणार नाही. उलट बेळगाव, कारवार, निपाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे सडेतोड उत्तर दिले आहे. याबरोबर सदर वादाची ठिणगी ही केंद्र सरकार सूचविल्याप्रमाणे कर्नाटक व महाराष्ट्र सीमावादाची जिल्हाधिकार्यांची बैठकीनंतर सीमावाद हा उफाळून निघाला. त्यानंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुका व्टिटच्या माध्यमातून वक्तव्य केले. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील सीमाभागात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रियाची राळ उठत आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उमपुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अक्कलकोट तालुक्यातील गावावर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्य निंदनीय असल्याचे सांगितले.
अक्कलकोट तालुक्यातून तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कन्नडमध्ये प्रतिक्रिया देताना म्हणाले, आम्ही कन्नड बोलतो, मात्र आमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असून महाराष्ट्राच्या मातीतच आमचे मरण आहे. आमचे पूर्वज आणि आगामी पिढी हे महाराष्ट्रातच राहणार असून कर्नाटकमध्ये घ्येण्याचे प्रयत्न करु नये त्यांचे प्रयत्न कदापि साध्य होणार नाही. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी कडाडून टीका करत महाराष्ट्र माझा-मी महाराष्ट्राचा यात महाराष्ट्रापासून आम्हाला कोणीही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदापीही सहन करणार नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली.
अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील एकाही व्यक्तीची कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा नाही. सध्या तिसरी पिढी चालु आहे. आमच्या पहिल्या पिढीची कुणाचीही कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा नव्हती. आता असलेल्या तिसर्या पिढीचीही कर्नाटक राज्यात जाण्याची मुळीच इच्छा नाही. कर्नाटक राज्यात तसेच महाराष्ट्रात व केंद्राही भाजपाचेच सरकार असल्याने एकत्रित बसून चर्चेव्दारे महाराष्ट्र-कर्नाटक सिमावाद सोडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. बेळगाव व निपाणी भागातील लोकांची काय मागणी आहे. त्या जनतेची काय इच्छा आहे, त्याप्रमाणे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली.
- अक्कलकोट तालुक्यातील एक इंच देखील जमीन कर्नाटक राज्यामध्ये जावू देणार नाही – शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख (शिंदे गट )
- मराठी भाषा ही आई तर कन्नड भाषा ही मावशी आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोटबाबत बाष्कळ वक्तव्य करु नये – ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर
- सीमावाद प्रश्न प्रकरणी कर्नाटक मुख्यमंत्र्यांनीवाद उफाळू नये अन्यथा आम्ही रस्यावर उतरू – रिपाइं तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे
- अक्कलकोट तालुका सोलापूर कदापिही कर्नाटकमध्ये जावू देणार नाही. याकरिता रस्त्यावर उतरु – रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर
- जुने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उकरुन काढत आहेत. याबाबत आम्ही तीव्र निषेध करीत आहोत – शहर प्रमुख योगेश पवार (शिंदे गट)
- सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने सोलापूर अक्कलकोट मध्ये राहत असताना सीमा वादासारखा प्रश्न उपस्थित करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे – एजाज मुतवल्ली मुस्लीम समाज अध्यक्ष
- मुख्यमंत्री बोम्मई यांनी आगामी कर्नाटक राज्यातील निवडणूकीचे पहावे उगाच सीमावादाच प्रश्न उपस्थित करुन राज्या-राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये – वसंतराव देडे लहुजी शक्ती सेना कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष
- अक्कलकोट तालुका कदापि कर्नाटकामध्ये जाणार नाही. तो घेण्यासाठी कर्नाटक सरकारने कधीही प्रयत्न करु नये. आमच्यासाठी अक्कलकोट, महाराष्ट्र ‘जिना यहां, मरना यहां’ असे आहे – भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड
- कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमावादा सारखा प्रश्न काढुन सामाजिक तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. अक्कलकोट, सोलापूरची इंच जमीन कर्नाटकला देणार नसल्याचे सांगितले – एजाजभाई बळोरगी, सामाजिक कार्यकर्ते
- महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटक राज्यात विलीन होणार नाही. उगाचच सीमावाद न वाढविता यास पुर्णविराम मिळायला हवा – भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. अक्कलकोट, सोलापूर बाबत कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विविध पक्ष, सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत