मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण जून महिन्यात लपंडाव खेळणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार पुनरागमन केले. राज्यात सध्या पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप वाढत आहे. त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आठवडाभरापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला होते. मात्र, आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. तसेच आता पावसाचा जोर देखील वाढणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.