मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महार्मागावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना धारूर येथील तेलगाव कारखान्याजवळ रस्ता ओलांडताना घडली. अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड असे या वारकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलु तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही दिंडी निघाली होती. या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. बुधवारी (दि.३) लाडनांद्रा येथून निघालेली या दिंडीचा शुक्रवारी ( दि.५) तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्काम होता. दरम्यान दिंडीतील वारकरी अण्णासाहेब गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.