बीड : वृत्तसंस्था
दहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. सुरुवातीला आपण सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी सरसकट शब्दाला पर्याय मागितला. आपण सगेसोयरे हा शब्द दिला. मुंबईत त्यांनी तो मान्यही केला; परंतु आता ते बदलले आहेत. मात्र, याच वेळी मुंबईत आपण चौथा शब्द हा शेती करणाऱ्या मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, असाही घातला होता. आता तसे आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली. दरम्यान, हे आरक्षण देणार नसतील तर सर्व आमदारांना पाडण्याचे काम मराठ्यांनी करावे, असे आवाहनही
यावेळी त्यांनी केले. बीड येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती, शांतता रॅलीचे आयोजन केले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आता जर आरक्षण नाही मिळाले तर पुढच्या २०-२५ पिढ्या वाया जातील. आमच्या वेदना तुम्हाला समजणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या केलेल्या घरात जाऊन एकदा बघावे, मरण काया असते आणि घरावर काय संकट असते हे आम्ही पाहिलेय. जस ओबीसी नेत्यांना त्यांच्या जातीचा गर्व असेल तर मलाही माझ्या जातीचा गर्व आहे. गरीबांनी गरीबांना साथ द्यावी. आम्ही काय नवीन मागत नाही, जे वाशीमध्ये ठरले होते, तेच द्या. सगेसोयऱ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करा, असेही ते म्हणाले.