ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेस व पवारांचा विरोध : उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढण्यास ?

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असून आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले कॉंग्रेस व शरद पवारांनी देखील विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे उद्धवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता. आता काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. शुक्रवारी (१९ जुलै) मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाविकास आघाडी हाच विधानसभेसाठी चेहरा असेल, असे स्पष्ट करण्यात आले.

उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरे अाहेत, असे जाहीर केले आहे. शुक्रवारी सकाळी ते उद्धव यांचे नाव न घेता म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर काही तासांनी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत उद्धव यांना मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून स्वीकारण्यास एकमताने नकार देण्यात आला. आपल्याला दिलेले मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन भाजप पाळत नाही, असा आरोप करून २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती, हे विशेष. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी राजीव गांधींची जयंती मुंबईत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे. त्याच दिवशी राहुल विधानसभा प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत सर्वांना त्याची माहिती मिळेल, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. ज्या ७ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली त्यात झिशान सिद्दिकी, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, शिरीष चौधरींची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय अन्य तीन आमदारांवरही पक्षाने कठोर कारवाई केली आहे. मात्र त्यांची नावे आताच सार्वजनिक करणे योग्य होणार नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!