छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत अमित शहांवर बोलणे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्या सारखे आहे असे म्हंटले होते. बावनकुळे यांच्या याच विधानाची शरद पवारांनी खिल्ली उडवली आहे. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला आहे असे पवार म्हणाले. पवार असे बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शरद पवार यांनी यावेळी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही परिणाम होईल” असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शिवाय मराठा आरक्षणाबाबत देखील सरकारला सल्ला दिला आहे. याच पत्रकार परिषदेत अमित शहा यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे असे शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर, तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. एका तडीपार व्यक्तीच्या हाती देशाचं संरक्षण आहे. त्यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे आहेत, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला होता.






