---Advertisement---

जात, आरक्षणाच्या मागे रहा : मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By team
On: August 9, 2024 10:52 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहेत. शिक्षणही नाही आणि नोकर्‍याही नाहीत. आत्महत्या सुरू आहेत. मराठा समाजाने आता तरी भानावर यावे. आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांमधील मराठ्यांनी आता पक्ष आणि नेता सोडून जातीच्या, आरक्षणाच्या मागे राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगलीत गुरुवारी जाहीर सभेत केले. आरक्षणाची लढाई संपू दे, अलमट्टीला धडक मारू. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त शेतकर्‍यांना भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. लोकसभेला हिसका दाखवला, आता विधानसभेबाबतही निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सांगली दौर्‍यावर होते. विश्रामबाग चौकातून राममंदिर चौकापर्यंत जनजागरण शांतता रॅली निघाली. राममंदिर चौकात रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. जरांगे यांच्या भाषणासला सुरुवात होताच मराठा बांधवांनी प्रचंड जल्लोष केला. ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणेने परिसर दणाणून सोडला.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सलग अकरा महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मराठा समाजानेही आता मागे हटायचे नाही. मराठा समाजातील कष्टकरी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांनी मोठ्या कष्टाने मुलांना शिकवले, पण नोकर्‍यांअभावी ते बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. पक्ष, नेता, आमदार, मंत्री यांच्यावरील निष्ठा आता थांबवा. मराठा समाजाच्या हिताकडे पाहा. तुमचा एक आमदार मोठा होईल. पाच-सहाजण जिल्हा परिषद सदस्य, दहा-बाराजण पंचायत समितीचे सदस्य होतील, पण त्या पंधरा-वीस जणांसाठी तालुक्यातील लाखो मराठ्यांचे वाटोळे करायचे आहे का?

एकटा छगन भुजबळ विधानसभेत मराठा आरक्षणाला विरोध करतो. विधानसभेतील मराठा समाजाचे शंभर-दीडशे आमदार मराठा आरक्षणासाठी आवाज उठवत नाहीत. त्यामुळे विधानसभेत आपले हक्काचे आमदार पाहिजेत. त्यामुळे मराठ्यांनी पक्ष, नेता बाजूला ठेवून जातीसाठी, आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!