मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाडा, खान्देश, पश्चिम विदर्भ व सोलापूर जिल्ह्यात रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस मुसळधार ते संततधार पावसाने हजेरी लावली. जूनपासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने चिंब भिजवून टाकले, सर्व धरणे, नदीनाले तुडंुब भरले. विशेष म्हणजे रविवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत अखंड जलधारा सुरू होत्या. रविवार ते सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यातील ४८३ मंडळांपैकी २८४ मंडळांत अतिवृष्टी म्हणजे ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
यंदाच्या मोसमात प्रथमच अतिपावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३१४.५० मिमी पाऊस परभणी जिल्ह्यातील पाथरीत, २७७ मिमी बाभळगाव मंडळात झाला. पूरपरिस्थितीमुळे मराठवाड्यात ६ जिल्ह्यांतील ८ जणांचा बळी गेला. संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीच्या शेवता खुर्द येथे शेतकरी, कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे १८ महिन्यांचे बालक वाहून वाहून गेले. बीड, नांदेडच्या पाचद गावात पुरात दोन मृतदेह सापडले. लातूर जिल्ह्यात बैल धुताना २४ वर्षीय शेतकरी वाहून गेला. हिंगोलीत तीन जण वाहून गेले, तर विदर्भात चौघांचा बळी गेला.
मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असलेल्या अजिंठा पर्वतरांगेत रविवारी रात्री ४ तासांत ११८ मिमी पाऊस झाला. त्यामुळे वाघूर नदीला चार वर्षांनंतर प्रथमच मोठा पूर आला. जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने एकाच रात्रीतून जामनेर तालुक्यातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. तोंडापूर धरणही ओव्हरफ्लो झाले. वाकोद येथे तोंडापूर रस्त्यावरील पुलावरून पाणी गेले. अडीच हजार केळीच्या झाडांचे नुकसान झाले. तसेच ४०० पैकी २०० मोसंबीच्या रोपांचे तर दोन एकरवरील मक्याचे नूकसान झाले. सुरत-नागपूर महामार्ग व्यारा बायपासजवळ पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन तास महामार्ग बंद होता. शिवाय पिंपळनेर-नवापूर रस्ताही पावसाच्या पाण्यामुळे पहाटे पाचपासून दुपारी दोनपर्यंत बंद होता.
सोलापूर शहर व जिल्ह्यातही रविवारी पहाटे सुरू झालेला संततधार पाऊस सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास थांबला. सुमारे ३६ तास अखंड जलाभिषेक सुरू होता. सुमारे दोन इंच पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली. पुढील २ दिवस असाच पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जिल्ह्यातील बहुतांश मध्यम व लघु प्रकल्प भरले आहेत. सलग पावसामुळे सोयाबीन, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात ४ ते ५ अंशाने घट झाली. रविवारी २५ अंश, तर सोमवारी २६ अंश तापमान होते.