मुंबई , वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे तर अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज भरताना चूकीची माहिती दिल्याने शिंदे यांच्या शिवसेनेपुढे संकट उभे राहिले आहे.
शिंदे यांनी आचारसंहितेदरम्यान उमेदवारांना एबी फॉर्म थेट हेलिकॉप्टरने पाठवल्याने आता चौकशी सुरू झाली आहे. तर सत्तार यांच्याविरोधात देखील तक्रार करण्यात आली असून याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. तर जिल्हाप्रशासनास आयोगाने २४ तासात माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
आगामी निवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापले असून काहीच दिवसात प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होणार आहे. यादरम्यान अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पक्षाचे एबी फॉर्म अनेकांनी आधीच घेतले होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले नव्हते. यामुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या उमेदवार धनराज महाले आणि देवळालीच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांना थेट हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्यात आले होते.
यावरूनच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्याची दखल आयोगाने घेत जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर आता मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली आहे. या चौकशीत हेलिकॉप्टरचा वापर, उमेदवारांची नावे, आणि संपूर्ण खर्चाची माहिती घेतली जात आहे. याबाबात अहवाल आल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर ही तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी आयोगाकडे केली. यावरून आयोगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना २४ तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. मालमत्ता, चारचाकी वाहन आणि दागिन्यांशी संबंधित खोटी माहिती सत्तार यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.