अकोला वृत्तसंस्था
भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यात वाद सुरूच आहेत. महायुतीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने युतीधर्म निभावला जाईल तशीच साथ माझी कन्नड, फुलंब्री आणि भोकरदन मतदारसंघात असेल. जर सिल्लोडमध्ये महायुती धर्म पाळला नाही तर, महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा थेट इशारा अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना दिला होता. यानंतर रावसाहेब दानवे यांनी औरंगजेब काय बोलतो हे मला शिवाजीला कशाला विचारता, असे म्हटले होते. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
अमोल मिटकरी म्हणाले की, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केलीय. इतकेच नाही तर महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यांना आमची विनंती आहे की स्वतःची तुलना शिवाजी महाराजांशी करताना आपलं तोंड आरशात पहावं. आपण बोलताना कोणाशी तुलना करतो, याची राजकीय अक्कल तुम्हाला असली पाहिजे. मी एक शिवप्रेमी म्हणून रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो. त्यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्रातले शिवप्रेमी जनता त्यांचे राजकारण इतिहासात जमा करून टाकेल. या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दानवे यांना महाराष्ट्राची माफी मागायला लावावी, असे त्यांनी म्हटले आहे.
रावसाहेब दानवे काय म्हणाले ?
कन्नड, सिल्लोड आणि फुलंब्रीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जाणार का? असा विचारले असता रावसाहेब दानवे यांनी सत्तार काय बोलतात ते सोडा. औरंगजेब काय बोलतो, ते मला शिवाजीला कशाला विचारता? असे म्हणत त्यांनी अब्दुल सत्तार ‘औरंगजेब’, मी ‘शिवाजी’ असल्याचे अधोरेखित केले. अब्दुल सत्तार यांना सिल्लोडच्या लोकांवर एक छाप टाकायची आहे. पण ते या निवडणुकीत चालणार नाही, त्यांनी म्हटले होते. सत्तारांनी त्यांची भाषा सुधारली पाहीजे. संयमाने वागले पाहिजे. तुम्ही जनतेचा आदर करा. जर केला नाही तर जनात तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.