ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेऊर झेडपी मतदारसंघातून उद्योजक लालचंद नडगम यांच्या नावाची जोरदार चर्चा

उमेदवारी देण्याची होतेय मागणी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून दोड्याळचे सुपुत्र आणि युवा उद्योजक लालचंद रेवप्पा
नडगम यांचे नाव सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर हा गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत आहेत. २०१२ नंतर पुन्हा एकदा अशी संधी उपलब्ध झाल्याने नडगम यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात उतरायचे ठरवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दोड्याळ ग्रामपंचायतीचा दीर्घ अनुभव, सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आणि साहित्यिक-राजकीय जाण या बळावर मी जेऊर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असल्याचे नडगम यांनी सांगितले. मतदार बांधवांच्या आशीर्वादाने मूलभूत सुविधा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोचविणे, गावानिहाय प्रश्न सोडविणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोचवणे हा माझा मुख्य उद्देश आहे,असेही ते म्हणाले.

गटातील प्रत्येक गावनिहाय बूथ कमिट्या स्थापन करण्याचा त्यांचा मानस असून, त्या माध्यमातून गावागावातील पाण्याचे प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, विजेच्या समस्या आणि सामाजिक अडचणी यावर ठोस तोडगा काढण्याचे नियोजन त्यांनी मांडले आहे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना जोडून एक मजबूत संघटना उभी करण्यावर त्यांचा भर आहे.

युवा बेरोजगार हा मतदारसंघातील प्रमुख प्रश्न असल्याने युवकांना प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची तयारी नडगम यांनी व्यक्त केली. सरकारी नोकऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने, उद्योजक म्हणून उपलब्ध संधींचा वापर करून युवकांना स्वाभिमानाने जगण्याची दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असे ते सांगतात.

गटातील निराधार, दिव्यांग आणि गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. मानधन योजना, आरोग्यसुविधा आणि घरकुल योजना यांचा लाभ एकाही पात्र नागरिकाला वंचित राहू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या कामामुळे स्थानिक पातळीवर अनेक कुटुंबांना शासन योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचे नागरिक सांगतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नडगम यांना मोठी प्रेरणा आहे. गेली पंधरा ते वीस वर्षे ते आंबेडकरी चळवळीशी कार्यरत असून, सामाजिक बदलाचे असंख्य उपक्रम त्यांनी राबवले आहेत. गावात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, आंबेडकर जयंती उत्सवांचे भव्य आयोजन आणि सामाजिक ऐक्यासाठी केलेली कामे विशेष दखलपात्र आहेत.

दोड्याळ येथे त्यांनी दहा वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक म्हणून ओळखले जाणारे आनंद शिंदे यांचा भव्य कार्यक्रम त्यांनी गावात आणला होता. समाजात अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि दुर्बल घटकांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नडगम कायम सांगत आले आहेत.

त्यांनी २०१७-१८ मध्ये घोळसगाव आणि बादोला बु येथे आंबेडकर जयंती साजरी करून समाज एकत्रीकरणाची चळवळ मजबूत केली. त्यांच्या नेतृत्वाखाली घोळसगावमध्ये पॅनल रचून सत्ता आणण्यात ते यशस्वी झाले होते. समाजातील तरुणांना सोबत घेऊन विकासाच्या वाटचालीसाठी त्यांनी निर्माण केलेला आत्मविश्वास उल्लेखनीय आहे.

भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने कोणता पक्ष त्यांना उमेदवारी देतो याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असून, सामान्य कुटुंबातून पुढे येऊन उद्योजक बनलेल्या या तरुण नेतृत्वाकडे आता आशेने पाहिले जात आहे. एक संधी मेहनती माणसाला, एक संधी सर्वसामान्य युवकाला, अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

दोड्याळ, जेऊर आणि परिसरात त्यांचे वडील रेवप्पा अर्जुन नडगम हे सध्या ग्रामपंचायत सदस्य असून, या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा कायम आहे. आगामी निवडणुकीत लालचंद नडगम यांच्या नावाची उमेदवारी देण्याची मागणी व्यापक पातळीवर होत असून, आरक्षित झालेल्या या मतदारसंघात ते एक प्रभावी आणि तडफदार उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही येत आहोत,असे सांगत त्यांनी मतदारांना आपली सेवा करण्याची तयारी दर्शवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!