---Advertisement---

पृथ्वी शॉची बॅट पुन्हा तळपली! टीम इंडियात पुनरागमनाचे स्वप्न कायम

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार अर्धशतक झळकावत आपल्या पुनरागमनाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. ईडन गार्डन्सवर झालेल्या रणजी ट्रॉफी एलिट गट ‘क’ मधील सामन्यात महाराष्ट्राने बंगालचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात शॉने अवघ्या ५० चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. चालू हंगामातील हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर काही वर्षांतच पृथ्वी शॉला कफ सिरपमध्ये आढळलेल्या प्रतिबंधित पदार्थाच्या सेवनामुळे आठ महिन्यांच्या निलंबनाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर वैयक्तिक आयुष्यातील विविध कारणांमुळेही तो चर्चेत राहिला. आयपीएलमध्येही त्याला संधी मिळणे बंद झाले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो पुन्हा क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत विचारले असता शॉ म्हणाला, “टीम इंडियात परतण्याचा विचार माझ्या मनात नेहमीच असतो. मी येथे चांगली कामगिरी करतो, ती पुन्हा भारतीय संघात खेळण्यासाठीच. मात्र, अनुभवातून एक गोष्ट शिकलो आहे की, फार दूरचा विचार करू नये. सध्या सामने जिंकणे, चांगला सराव करणे आणि योग्य आहार घेणे यावरच माझे लक्ष आहे.”

आपल्या फलंदाजीबाबत बोलताना शॉने सांगितले की, प्रत्येक सामन्यातील डाव सारखे नसतात. काही वेळा चांगले चेंडू खेळताना बाद व्हावे लागते, तर काही वेळा स्वतःचे फटके खेळताना विकेट गमवावी लागते. मात्र, फलंदाजीच्या सुरुवातीमध्ये कोणतीही अडचण नसून आपली फलंदाजी चांगली सुरू आहे. आता केवळ एका मोठ्या आणि प्रभावी खेळीची गरज असल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे रणजीतील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुनरागमन करण्याचे पृथ्वी शॉचे स्वप्न कायम आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!