नवी दिल्ली, वृत्तसंस्था : क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. अंडर-19 आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज (१४ नोव्हेंबर) भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचे लक्ष्य आशिया चषकाची ट्रॉफी जिंकण्याचे असणार आहे. विशेष म्हणजे, गट टप्प्यात पाकिस्तानने भारताचा ३ विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय युवा संघाकडे आहे.
या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने लक्ष वेधले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यांच्याकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असणार आहे. आर्यवीरने आतापर्यंत ३०३ धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, भारतीय गोलंदाज ईशान सूदने चार सामन्यांत ११ बळी मिळवत प्रभावी कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर असेल. पाकिस्तानकडून उस्मान खान आणि हमजा झहूर या फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर रिझवानुल्ला आणि मोहम्मद सय्यम हे गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करू शकतात.
विशेष म्हणजे, पाकिस्तानचा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर कडवे आव्हान असणार आहे. गट टप्प्यातील पराभव विसरून भारतीय युवा खेळाडू अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंडर-१९ आशिया कपचा अंतिम सामना आज, शनिवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच सोनी लिव्ह ॲपवर सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.











