---Advertisement---

विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या… !

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत विलिनीकरण आणि एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार होते तोपर्यंतच विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे दावे केले जात होते. विविध नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि वक्तव्यांमुळे या चर्चांना अधिकच वेग आला होता. तसेच शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी एनडीएसोबत जाण्याची कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. जिथे चर्चाच झालेली नाही, तिथे कॉमा किंवा फुलस्टॉपचा प्रश्नच येत नाही, असे त्या म्हणाल्या.

विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या चर्चांचा आता मला कंटाळा आला आहे. माझे भाऊ अजित पवार हयात होते, तोपर्यंत विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. त्यासंदर्भात तारीखही ठरली होती. मात्र, ज्या दिवशी अजितदादांचे निधन झाले, त्याच दिवशी माझ्या मनात आणि पक्षात विलिनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम मिळाला. यापुढे या विषयावर मी बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विलिनीकरणाबाबत जे काही ठरले होते, ते अजितदादांसोबत ठरले होते. त्यानंतर आमच्या पक्षाकडून विलिनीकरणाबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. अजित पवार गटाकडून आलेल्या विधानांवरही आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अजित पवार गटाकडून कोणताही प्रस्ताव, फोन किंवा संदेश आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवे वळण मिळाले असून, आगामी काळात दोन्ही गटांची राजकीय दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!