सोलापूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या आणि राजयोग शिक्षिका बीके शिवानीदीदी यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, सोलापूर यांच्या वतीने गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी ‘सरल मन, सरल जीवन’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ८ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताणतणाव, नकारात्मक विचार आणि मानसिक अस्वस्थता यामुळे मनःशांती व आनंदी जीवन जगणे मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर सकारात्मक विचार, आध्यात्मिक दृष्टिकोन आणि राजयोगाच्या माध्यमातून जीवन अधिक शांत, संतुलित व आनंदी कसे बनवता येईल, याविषयी बीके शिवानीदीदी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात मनःशांती, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, भावनिक बुद्धिमत्ता, स्वव्यवस्थापन, नातेसंबंधांमधील सुसंवाद, कर्मसिद्धांत, आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मपरिवर्तन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. मनातील नकारात्मक विचारांवर मात करून समाधानकारक जीवन जगण्याची प्रेरणा या प्रवचनातून मिळणार आहे.
कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नोंदणी झाली नसली तरी नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने उपस्थितांनी वेळेत पोहोचावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी www.eoshakti.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ८६६९१६३३७२ किंवा ७७७४९९८८७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
या कार्यक्रमाची माहिती बीके प्रदीपभाई शिंगवी, बीके प्रज्ञादीदी, बीके अनितादीदी आणि डॉ. नंदा भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बीके पूनमदीदी आणि बीके शिवराजभाई मजगे उपस्थित होते.
मेडिटेशनच्या जादुई प्रभावावर तीन दिवसीय शिबिर
दरम्यान, २०, २१ आणि २२ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवसांत ‘मेडिटेशनचा जादुई प्रभाव’ या विषयावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपती रंगभवन येथे सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत हे शिबिर होणार आहे. बीके डॉ. दामिनीदीदी या शिबिरात मार्गदर्शन करणार असून सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











