---Advertisement---

मोदी-शाह यांचा विरोधकांना फोबिया! शिंदेंचा टोला

Follow Us:
---Advertisement---

पुणे, वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरणही तापले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील भारत फोर्ज लिमिटेडला भेट दिल्यानंतर अमित शाह मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. तसेच मोदी आणि शाह यांच्या नावाचा विरोधकांना फोबिया झाला असल्याची टीका करत त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.

तळेगावची भूमी उद्योगांना नवी चेतना देणारी असून, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू होत असून, यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सहकार क्षेत्र पूर्वी डबघाईला आले होते. मात्र, अमित शाह यांनी ‘डिलीट बटन’ दाबून सहकार क्षेत्र पुन्हा सुरळीत केले. त्यांनी सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचे काम केले आहे. अशक्य गोष्ट शक्य करणाऱ्या अमित शाह यांना माझे वंदन आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.

‘विरोधकांना मोदी-शाह यांचा फोबिया’

विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नावाचा फोबिया झाला आहे. त्यांच्या पोटात मळमळ आणि जळजळ होत आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम मोदी आणि शाह यांनी केले आहे. मागील सरकारच्या काळातील भ्रष्टाचारामुळे अनेक कारखाने बंद पडले होते. मात्र, २०१४ नंतर बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होण्यास सुरुवात झाली, असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीसाठी बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अमित शाह यांचा नेहमीच एक हात पुढे असतो, असेही शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान, अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात सहकार क्षेत्राच्या विकासासह औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या मुद्द्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपही पुन्हा चर्चेत आले आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!