बीड वृत्तसंस्था – बीडचा प्रमुख उद्योग राजकारण आहे आणि बाकीचे जोडधंदे आहेत, अशी मिश्किल टिप्पणी माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केली आहे. अंबाजोगाई येथील एका उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी बीडच्या राजकीय वातावरणावर केलेल्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. मी केवळ कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आले आहे. याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये, असे त्या म्हणाल्या. मात्र, एवढे लोक मंचावर असताना राजकारणाची चर्चा होणार नाही, हे शक्य नसल्याचेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
बीडचा प्रमुख उद्योग राजकारण असून बाकीचे सर्व जोडधंदे आहेत. शेती वगैरे आपला प्रमुख व्यवसाय नाही, तर राजकारण हाच मुख्य व्यवसाय आहे. इथल्या प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाच्या नसानसात राजकारण भरलेले आहे. जगात इतर ठिकाणी काय घडेल, हे सांगता येत नाही; मात्र बीडमध्ये प्रत्येक गोष्टीचे पडसाद उमटतात, असे त्या म्हणाल्या.
कोणतेही आंदोलन असो किंवा धरणे, ते बीडमध्ये झाल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी हशा आणि टाळ्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी निवडणुकीच्या चर्चेलाही मिश्किलपणे उत्तर दिले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्तींची नावे आधीच घेतली आहेत. त्यामुळे आता कोणाचेही नाव घेण्याची गरज नाही. कारण मला निवडणुकीला तुमच्याकडे मत मागायला यायचे नाही, असे त्या म्हणाल्या. केज मतदारसंघाचा उल्लेख करत त्यांनी सध्या कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांसोबतचे ऋणानुबंध जपण्यासाठी आपण कार्यक्रमांना उपस्थित राहत असतो. मला कार्यकर्त्यांशिवाय करमत नाही आणि त्यांनाही माझ्याशिवाय करमत नाही. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असेही प्रीतम मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रीतम मुंडे यांनी बहिणीच्या प्रचारासाठी आघाडी घेतली होती. मात्र, या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना विजय मिळवता आला नाही. आता प्रीतम मुंडे यांच्या बीडच्या राजकारणावरील मिश्किल वक्तव्याची चर्चा रंगली आहे.









