मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी मातोश्रीवर गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार, पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवार उपस्थित होते. या बैठकीतून मोठी बातमी समोर येत आहे.
बैठकीमध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी या उमेदवारांनी एबी फॉर्म न घेता मातोश्रीवरून काढता पाय घेतला. ‘आम्ही नंतर एबी फॉर्म घेऊ’ असं सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुवारी मातोश्रीवर झालेली बैठक उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतली. कारण उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बैठकीला न येता आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली.
ज्यांना एबी फॉर्म घ्यायचे आहेत त्यांनी आज घ्या आणि ज्यांना नंतर घ्यायचे आहेत त्यांनी नंतर घ्या, तेव्हा साहेब असतील असं यावेळी सांगण्यात आलं. एबी फॉर्म देण्यात येत होते मात्र आमदार आणि उमेदवारांनी आम्ही नंतर एबी फॉर्म घेऊ असं कळवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच आमदार आणि उमेदवारांनी फॉर्म घेतले असते तर शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश गेला असता. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या अनुपस्थित आपण एबी फॉर्म घेऊन जाणे चुकीचं आहे, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल. म्हणून कोणत्याही आमदार आणि उमेदवाराने एबी फॉर्म घेतला नाही. दोन दिवसात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उमेदवार एबी फॉर्म स्वीकारतील अशी सूत्रांची माहिती आहे.
या बैठकीला सुनील प्रभू, रमेश कोरगांवकर, सुनील राऊत, राजन साळवी, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, कैलास पाटील, भास्कर जाधव, शंकरराव गडाख, वैभव नाईक, नितीन देशमुख, राहुल पाटील या आमदारांची उपस्थिती होती.
तसेच संभाव्य उमेदवारांमध्ये स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ, सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम, अद्वय हिरे – मालेगाव बाह्य, नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ, अनिल कदम – निफाड, मनोहर भोईर – उरण विधानसभा यांची उपस्थिती होती. तर अजय चौधरी, उदयसिंग राजपूत, प्रकाश फातर्पेकर यांची अनुपस्थिती होती.