अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट खरेदी दस्त नोंदणीचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. हे कार्यालय आता सोमवारपासून अरब गल्ली म्हणजे पागा चाळीच्या पाठीमागे असलेल्या नगरपरिषदेच्या शाळेत सुरू
राहणार आहे याची नोंद तालुक्यातील नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन दुय्यम निबंधक डी.डी चाटे यांनी केले आहे.
अक्कलकोट येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला नवीन इमारतीसाठी राज्य सरकारकडून २.०३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला आहे.जुन्या इमारतीच्या ठिकाणीच कारंजा चौक येथे नव्याने प्रशस्त इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी जाणार आहे. या काळात दस्त नोंदणी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे.या ठिकाणी देखील नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आले आहेत.सोमवारपासून हे नवीन कार्यालय नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.