मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात केला जाणार, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशना अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता असल्याने राज्यात महायुतीतील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे.
यावर काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतल्या बैठकीत याविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाअगोदर २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची कामगिरी अजित पवार गटापेक्षा चांगली राहिली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या नेत्यांना मंत्रिपदाची वर्णी लागण्याचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिदे गटातून आशिष जैस्वाल, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, आणि लता सोनावणे यांच्या नावाची चर्चा आहे. तर अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप आणि भाजपकडून आमदार नितेश राणे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील, देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.