अयोध्या : वृत्तसंस्था
देशभरातील रामभक्तांचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या येथे आज राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पूर्ण झाली आहे. श्रीराम विग्रहाचे प्रथम दर्शन झाले आहे. त्यांच्यासोबत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
संकल्प घेऊन पूजेला सुरुवात केली आणि आरतीनंतर साष्टांग नमस्कार केला. मोदींनी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचून प्राण-प्रतिष्ठा पूजेचा संकल्प घेतला आणि आचमन पावित्र्य केले. यानंतर पूजा सुरू झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या हातातून कुशा आणि शलाका ओढली. मंत्रोच्चारासोबतच श्रीरामलल्लाच्या चरणी जल सोडण्यात आले, त्यानंतर अक्षत व पुष्प अर्पण करण्यात आले. यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून पूजा पूर्ण करण्यात आली. यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग नमस्कार केला आणि संतांचे आशीर्वाद घेतले. आज सकाळी रामलल्लाला मंत्रोच्चाराने जागे करण्यात आले. यानंतर वैदिक मंत्रोच्चारांनी प्रार्थना झाली. दहा वाजल्यापासून शंखांसह ५० हून अधिक वाद्यांच्या मंगलमय आवाजात प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुपारी 12.29 वाजता प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी सुरू झाला. 84 सेकंदात मूर्तीमध्ये प्राण स्थापना झाली.
प्राणप्रतिष्ठेनंतर मंडपात वसोधारा पूजा होईल. ऋग्वेद आणि शुक्ल यजुर्वेदाच्या शाखांचे होम आणि पारायण होईल. यानंतर सायंकाळी पूर्णाहुती होऊन देवतांचे विसर्जन होईल. या उत्सवात करण्यात येणारे वैदिक विधी व शुभ संस्कार 16 तारखेपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी प्रयश्चित होम म्हणजेच शुद्धीकरणाची प्रक्रिया झाली. यानंतर कलश पूजन व मूर्तीची शोभायात्रा होऊन मूर्ती आवारात दाखल झाली. जलयात्रा आणि तीर्थ पूजा झाली आणि अधिवास झाले. मूर्तीचे पावित्र्य आणि शक्ती वाढविण्यासाठी मूर्तीला पाणी, तूप, औषधे, केशर, मध, फळे, धान्ये आणि सुगंधी गोष्टींमध्ये ठेवण्यात आले.. याला अधिवास म्हणतात. यानंतर 20 जानेवारीला श्री रामलल्लाला स्थापित करण्यात आले.






