---Advertisement---

अक्कलकोटमध्ये २८ ऑगस्टपासून गणेशोत्सव व्याख्यानमाला

By team
On: August 26, 2025 9:28 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा सांस्कृतिक सोहळाच नव्हे तर विचारांचे, संस्कृतीचे आणि ज्ञानाचेही पर्व आहे. या जाणिवेतूनच विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानमाला आयोजित करत असते. यंदाही प्रतिष्ठानने सलग १४ व्या वर्षी हा उपक्रम राबवित असून गुरुवार, २८ ऑगस्ट ते बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन, कमलाराजे चौक येथे दररोज संध्याकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वे आपल्या विचारांचा व अनुभवांचा खजिना रसिकांपुढे उलगडणार आहेत.

या व्याख्यानमालेची माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले,गणेशोत्सव हा समाजात विचारांना चालना देणारा, संस्कार घडविणारा आणि युवकांना प्रेरणा देणारा सण आहे. विवेकानंद प्रतिष्ठानने या हेतूने नामवंत व्याख्यात्यांची मेजवानी रसिकांसाठी सिद्ध केली आहे. साहित्य, व्यवस्थापन, अभिनय, संस्कृती आणि जीवनमूल्ये अशा चतुरस्त्र विषयांवर या व्याख्यानमालेत चर्चासत्रे व सादरीकरणे होतील.

सात दिवसांची ही व्याख्यानमाला विविधतेने परिपूर्ण आहे. पहिल्या पुष्पात २८ ऑगस्ट रोजी “महाराष्ट्रातील गड व किल्ले” या विषयावर शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष विनायक खोत एलईडी प्रेझेन्टेशनसह ऐतिहासिक वैभव मांडतील. दुसऱ्या पुष्पात २९ ऑगस्ट रोजी सायबर फ्रॉड, हनीट्रॅप व आपण या आजच्या काळातील महत्त्वपूर्ण विषयावर पुण्याचे सायबर तज्ञ डॉ. धनंजय देशपांडे प्रबोधन करतील.

शनिवार, ३० ऑगस्ट रोजी तिसऱ्या पुष्पात रश्मी देव ह्या देवी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांवरील नाटिकेचे सादरीकरण करतील. चौथ्या पुष्पात ३१ ऑगस्ट रोजी ‘राजयोग निर्मित स्नेह पुणे’ प्रस्तुत “आनंदडोह” ही संत तुकारामांवरील नाटिका रंगभूमीवर साकारली जाणार असून लेखक योगेश्वर, दिग्दर्शक आनंद स्वरूप
आणि संगीतकार केदार दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सोमण यांच्यासह कलाकार मंडळी हे नाट्यरूपांतरण सादर करतील.

सोमवार, १ सप्टेंबर रोजी पाचव्या पुष्पात स्वप्नील रास्ते यांच्या नेतृत्वाखाली “उत्सव लोकगीतांचा” ही लोकसंगीताची मैफल रंगणार आहे. यात गायक कलाकार म्हणून सुजित सोमण, अमिता घुगरी, जयंत पानसरे आणि देविका दामले सहभागी होणार आहेत. सहाव्या पुष्पात २ सप्टेंबर रोजी अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर आणि अवधूत गांधी “श्वासात राजं ! ध्यासात राजं !!” या प्रेरणादायी कलाकृतीतून रसिकांना छंदमयी अनुभव देतील.

तर अंतिम सातवे पुष्प ३ सप्टेंबर रोज एका रोमांचक आणि प्रेरणादायी विषयावर आधारित आहे. “ऑपरेशन सिंदूर ,पराक्रम अभूतपूर्व ” या विषयावर निवृत्त एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट आणि निवृत्त विंग कमांडर अविनाश मुगळ एलईडी प्रेझेन्टेशनसह थरारक माहिती मांडतील. साहित्य, कला, इतिहास, तंत्रज्ञान, संस्कृती व राष्ट्रीय सुरक्षेपासून ते जीवनमूल्यांपर्यंत या व्याख्यानमालेत विषयांची वैविध्यता दिसून येते. त्यामुळे गणेशोत्सवाची ही व्याख्यानमाला ही अक्कलकोटकरांसाठी ज्ञान, मनोरंजन आणि प्रेरणा यांचा संगम ठरणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील सर्व रसिक, विशेषत: युवक-युवतींनी या व्याख्यानमालेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार कल्याणशेट्टी यांनी केले.

यावेळी प्रतिष्ठान सदस्य अशोक येणगुरे, मनोज कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन मसुती, विलास कोरे, संतोष जिरोळे, नितीन पाटील, निनाद शहा, निरंजन शहा, मल्लिकार्जुन आळगी, अमोल कोकाटे, महेश कापसे ,प्रदीप पाटील, गुरुपादप्पा आळगी, मल्लिनाथ मजगे,
चंद्रकांत दसले आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!