ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवारांच्या निधनाचा राष्ट्रवादीवर परिणाम; उमेदवारांना दिले महत्वाचे आदेश !

बारामती : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. दि. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असताना विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या घटनेने राज्यात शोककळा पसरली आहे.

अजित पवार यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. काल बारामतीसह राज्यभर शोक व्यक्त करण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानंतर अजित पवार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. दि. २८ जानेवारी रोजी बारामतीत त्यांच्या चार सभा नियोजित होत्या. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी अपघात घडला.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाने निवडणूक प्रचार पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे कोणत्याही प्रचार सभा किंवा रोड शो घेतले जाणार नाहीत. उमेदवारांनी केवळ घरोघरी जाऊन मतदारांना पत्रके वाटून प्रचार करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय, निवडणूक जिंकल्यानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नसल्याचा निर्णयही पक्षाकडून घेण्यात आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, अशा परिस्थितीतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण शोकमय झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!