ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी जमा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्यापोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी केला. यामुळे देशातील सुमारे ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे २२ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची ही आर्थिक मदत दिली जाते. या योजनेला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

१९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, पीएम किसान योजनेला ६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. हे माझ्यासाठी खूप समाधान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आमचा हा प्रयत्न अन्नदात्यांसाठी आदर, समृद्धी आणि नवीन शक्ती देत ​​आहे.

गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला आहे. आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे बाजारपेठेतील त्यांची उपलब्धता वाढली आहे. यासोबतच शेतीचा खर्च कमी झाला आहे आणि उत्पन्नही वाढले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!