बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खुनातील आरोपी अटकेत असतांना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाल्मीक कराडनंतर आता बीडच्या शिरूर येथील कुख्यात गुंड सतीश भोसलेचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा खंदा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे धस यांची कोंडी होत आहे. दरम्यान, एका ऑडिओ क्लिपमध्ये धस हे भोसलेला माझा तुला 99 नव्हे तर 100 टक्के आशीर्वाद असल्याचे म्हणताना ऐकू येत आहेत. या क्लिपमुळे धस यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीडमधील राजकीय गुन्हेगारीमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्याविरोधात आमदार सुरेश धस यांनी रान पेटवले होते. तसेच नैतिकतेच्या बक्कळ बाताही मारल्या होत्या. पण आता त्यांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसलेचे मारहाणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना त्यांची व सतीश भोसले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिप ही सुरेश धस यांनी सतीश भोसलेल्या केलेल्या कॉलची आहे. त्यात धस भोसलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचा उल्लेख खोक्या म्हणून करताना ऐकू येत आहेत. सुरेश धस म्हणतात, ऐ खोक्या, हॅलो अरे सॉरी हा बाबा, मला गडबडीमध्ये जमल नाही शुभेच्छा द्यायला. त्यावर सतीश भोसले म्हणतो की, बोला ना..सुरेश धस पुढे म्हणतात, काय नाही… काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा. यावर सतीश भोसले म्हणतो, धन्यवाद भाऊ…तुमचा आशीर्वाद राहु द्या फक्त पाठिशी…त्यावर सुरेश धस म्हणतात, 100 टक्के आहे 100 टक्के…99 सुद्धा नाही.
आता या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ माजली आहे. सर्वसामान्य लोकांना मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला सुरेश धस यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे. विशेष म्हणजे गत काही दिवसांत सतीश भोसलेचे मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यानंतर पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.त्यानंतर बीडच्या बावी येथील ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. अवघ्या 24 तासांत 2 गुन्हे दाखल झाल्यामुळे भोसले फरार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.