मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार हालचाली सुरु केल्या असून नुकतेच महाविकास आघाडीत देखील विधानसभेच्या जागावाटपासाठी बैठकांचे सत्र आहे. मुंबईतील ३६ जागांच्या वाटपासाठी तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांची सोमवारी दुसरी बैठक झाली. यात उद्धवसेनेने २० ते २२ तर शरद पवार गटाने ५ ते ७ जागांसाठी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने वर्सोवा, सायन कोळीवाडा, वांद्रे (पूर्व), चांदिवली असे जे विधानसभा मतदारसंघ लढवले होते, त्या जागांवर उद्धवसेनेने दावा केल्यामुळे काँग्रेसच्या अडचणींत वाढ झाली. मात्र अद्याप निर्णय झाला नाही.
बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मुंबईत उद्धव ठाकरे मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार आहेत. आमची सकारात्मक चर्चा झाली. अजून एक-दोन बैठकांमध्ये मुंबईचे जागावाटप निश्चित होईल. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनीही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला.
मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले, ‘मुंबईतील १६ जागांवर संघर्षाची स्थिती आहे. २०१९ मध्ये मालाड-पश्चिम, वांद्रे-पूर्व , धारावी आणि मुंबादेवी या जागा काँग्रेसने जिंकल्या. या चार जागांव्यतिरिक्त काँग्रेससाठी ठाकरे गट फक्त ८ ते ९ जागाच सोडण्यास तयार आहे. ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांच्यासाठी वांद्रे (पूर्व) जागेची मागणी केली आहे. त्या बदल्यात नसीम खान यांच्यासाठी काँग्रेसने चांदिवलीची जागा मागितली आहे. तसेच अंधेरी (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) या दोन्ही जागांवर काँग्रेस दावा करत आहे. मात्र सोमवारच्या बैठकीत तिन्ही पक्षांची मुंबईतील जागांबाबत सहमती न झाल्याने कुठल्याही निर्णयाविना बैठक संपली.