मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरत लुटीविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग भोगला. पण यांच्या लोकांनी माफीनामे लिहिले. त्यामुळे या माफीवीरांना स्वराज्यासाठी शिवछत्रपती व काँग्रेसने काय केले हे केव्हाच कळणार नाही, असे ते म्हणालेत.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने शिवरायांनी सूरत लुटल्याचा खोटा इतिहास शिकवल्याचा दावा केला आणि विरोधकांनी पुन्हा सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. पण त्यांचा दारुण पराभव झाला. भाजप या धक्क्यातून अजून सावरला नाही. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबवली तर कदाचित परिस्थिती सुधारेल असे त्यांना वाटत आहे. काहीही झाले तरी त्यांना 26 नोव्हेंबरच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. अन्यथा त्यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली आहे.