मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळीत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती केली होती. आता राज्याच्या विधानसभा निवडणुका संपताच होताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री राज्य सरकारकडून एक शासन आदेश जारी करण्यात आला. या आदेशात रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले होते. आज (मंगळवार) पासून रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील, असे नमूद करण्यात आले आहे.
त्यातच रश्मी शुक्ला यांनी शनिवारी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. यानंतर लगेचच सोमवारी रश्मी शुक्लांच्या पोलीस महासंचालक पदाच्या नियुक्तीचे शासन आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले.