मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारच्या घटना वाढत असतांना नुकतेच कोकणातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. देवरूखहून रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर जंगलात बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, हिंदू जनजागरण संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक संघटना रुग्णालयात पोहोचल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
पीडित मुलगी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण संस्थेत नर्सिंगच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती मूळची देवरूखची असून सध्या साळवी स्टॉप परिसरात राहते. रविवारी (दि. 25) प्रशिक्षण संस्थेला सुट्टी असल्याने ती देवरूख येथील घरी गेली. नेहमीप्रमाणे ती सोमवारी सकाळी सहा वाजताच्या बसने देवरूखहून रत्नागिरीला आली. ती सकाळी सातच्या सुमारास बसस्थानकावरील साळवी स्टॉपवर उतरली आणि संस्थेत जाण्यासाठी रिक्षात बसली. यानंतर चालकाने त्याला पिण्यासाठी पाणी दिले. यानंतर ती बेशुद्ध पडल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
ती बेशुद्धावस्थेतून उठली तेव्हा ती चंपक मैदानाच्या जंगलात पडून होती. तसेच तिचे कपडे फाटलेले होते. हातावर ओरखड्याच्या खुणा होत्या. तिचे संपूर्ण सामना जंगलात फेकलेले होते. वस्तू गोळा केल्यानंतर तीने बहिणीला तिच्या मोबाईलवर कॉल केला. यानंतर ती कशीतरी मुख्य रस्त्यावर पोहोचली आणि दुचाकीस्वाराच्या मदतीने प्रथम तिच्या फ्लॅटवर पोहोचली. त्यानंतर ती उपचारासाठी रुग्णालयात गेली. ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पोलिसांना हा प्रकार कळला आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रुग्णालयात येऊन पीडितेची भेट घेऊन गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने उपचार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने सीसीटीव्ही आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी रवाना झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी फरार आहे.