मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु झाली होती. त्यानुसार आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पाडली जात आहे. या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात महायुतीकडून एकुण 9 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे 5, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन-दोन असे उमेदवार आहेत.
अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असून सहा अतिरिक्त मतांची गरज आहे. यातच आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक सुचक ट्वीट केले आहे. “‘गर्जे’ल तो पडेल काय? #खेला_होबे” असं ट्वीट सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर केलं आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी थेट अजित पवार गटातील उमेदवार पडण्याचे संकेत दिले आहेत.
अजित पवारांकडून दोन उमेदवारांना संधी
दरम्यान, अजित पवारांकडून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधारेंनी ‘गर्जे’ल असा शब्द वापरत त्यात गर्जे या शब्दाला कोट केल्यामुळे त्यांचा रोख शिवाजीराव गर्जे यांच्याकडे दिसत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा आहे.
विधान परिषदेच्या जागा 11 तर 12 जण या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. पण हा उमेदवार महाविकास आघाडी की महायुतीचा हे निकालादिवशीच समजेल. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगही महत्त्वाचे व निर्णयात्मक ठरणार आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.