मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूकिपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आपण सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही महायुती व मविआतील नाराजांना आपल्यासोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेतल्यास आमच्या इच्छुकांचा प्रश्न उपस्थित होईल, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला विश्वासात घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ते कुणाला उमेदवारी देणार? ते महाविकास आघाडी व महायुतीमधील नाराज उमेदवारांना संधी देणार का? असे विविध प्रश्न याविषयी उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सोमवारी उपरोक्त भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या लाटेवर स्वार होऊन विधानसभेत पोहोचण्याची इच्छा बाळगणाऱ्या मविआ व महायुती या दोन्ही आघाड्यांतील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे अनेक इच्छुक उमेदवार मला येऊन भेटत आहेत. पण मी महायुती व महाविकास आघाडीतील कोणत्याही नाराज नेत्याला आमच्यासोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेतल्यास आमच्यातील इच्छुकांचा प्रश्न उपस्थित होईल. तूर्त आमचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला, तर उमेदवारांची नावे समाजापुढे ठेवले जातील. त्यानंतर समाजाने योग्य तो निर्णय घ्यावा. आमची एकजूट असल्यामुळे कुणीही कुणाचे पाय खेचणार नाही. आमच्याकडे उमेदवारांची कमतरता नाही. मनोज जरांगे म्हणाले, माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही. तसा हेतूही नाही. तसे असते तर ते यापूर्वीच जाहीर केले असते. इतरांना तुम्ही आमदार व्हा असे मी सांगितले असते. मला माझा स्वार्थ महत्त्वाचा नाही. माझी समाजासाठी संघर्ष करण्याची इच्छा आहे. सरकारला आमची विधानसभेची भूमिका पहायची होती. पण त्यांनी निवडणुकाच पुढे ढकलण्याची घोषणा केली. मग आम्हीही आमचा निर्णय पुढे ढकलला. विधानसभेला कुणाला टार्गेट करणार हे आम्ही आताच स्पष्ट करणार नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. त्याचा विधानसभेलाही प्रत्यय येईल.