अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विकास तर काहीच नाही परंतु विमानतळाच्या विकासाचा मुद्दा पुढे करून कारखान्याची चिमणी केवळ द्वेषापोटी पाडली गेली.हे कारखान्याचे सभासद आणि शेतकरी विसरलेले नाहीत.शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे.यावेळी कोणत्याही परिस्थितीत त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशी टीका श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केली.शुक्रवारी,चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना काडादी म्हणाले,राजकारण कुठपर्यंत करावे याला मर्यादा असते. ज्या शेतकऱ्यांवर देशाचे अर्थकारण अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे पाप भाजपने केले आहे.हजारो शेतकऱ्यांचे आधारस्तंभ असलेल्या श्री सिद्धेश्वर कारखान्याबाबतीत द्वेष बाळगून चिमणी जाणीवपूर्वक पाडली.यातून कारखान्याचेही प्रचंड आर्थिक नुकसान झाले. मुळात भाजपची भूमिका शेतकरी विरोधी आहे त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले आहे असे सांगत काडादी यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली.
२० जुन २०२३ रोजी हायकोर्टाकडून सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला स्टे मिळणार होता,ही माहिती देऊन देखील भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन पाच दिवस अगोदर मोठा पोलीस बंदोबस्त लावून चिमणी पाडण्याचे कारस्थान केले,असा आरोप त्यांनी केला.स्मार्ट सिटीच्या नावाखाली लोकांना फसवले गेले आहे.चिमणी पाडून विमानतळ सुरू होईल हे खोटे आश्वासन दिले असून अद्यापही विमान उडालेले नाही याचा विचार भाजपच्या लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.सभे दरम्यानमाजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला.भाजपच्या चपळगाव येथील सभेत महायुतीचे उमेदवार राम सातपुते व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या टीकेला या सभेतून त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.आमदार राम सातपुते यांनी उजनीचे पाणी आणण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि मी मंत्रालयात दररोज २५ किलोमीटर चालायचो,असे सांगितले होते. यास प्रत्युत्तर देताना म्हेत्रे यांनी ज्या माणसाला मंत्रालयाची लांबी व रुंदी माहित नाही, असे लोकप्रतिनिधी जनतेचे काय भले करणार ,असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
व्यासपीठावर माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे,जलतज्ञ प्रफुल्ल कदम,मल्लिकार्जुन पाटील,पांडुरंग चव्हाण,अशपाक अगसापुरे,सिध्दाराम भंडारकवठे,सिध्दार्थ गायकवाड,विश्वनाथ भरमशेट्टी,व्यंकट मोरे,अंबणप्पा भंगे,शाकीर पटेल,विनीत पाटील,प्रतिक्षित चौगुले,प्रा.परमेश्वर अरबाळे,अर्जुन आगावणे,इसहाक पटेल,सोपान निकते यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सलीम पटेल यांनी केले.मागच्या दोन दिवसांपासून अक्कलकोट मतदारसंघात काडादी यांचे दौरे सुरू आहेत.पहिल्या दिवशी अंकलगे,कुडल, शेगाव,धारसंग या गावात इंडीचे आमदार यशवंतराव गौडा पाटील,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,मल्लिकार्जुन पाटील,संचालक सिद्धाराम व्हनमाने,विद्याधर मुलगे,अशोक देवकते,सुरेश झळकी, बाबूराव पाटील,अशोक बिराजदार आदींनी दौरा केला.यावेळी कारखान्याचे सभासद,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.