मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी एकत्र येवून निवडणूक लढविली होती, मात्र अपेक्षित यश न आल्याने आता आगामी विधानसभा निवडणूकिपूर्वी या महायुतीमध्ये धुसफूस दिसून येवू लागली आहे. त्यामुळे अजित पवारांनी भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांना फटकारले आहे.
माझ्या कार्यकर्त्याला कुणीही वेडवाकडं बोललेलं खपवून घेणार नाही, असा दम अजित पवारांनी महायुतीतील शिंदेसेना, भाजप या मित्रपक्षांना दिला आहे. दादांनी पहिल्यांदाच जाहीरपणे वक्तव्य केले आहे. तत्पूर्वी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्यांना पाठिंबा देऊ नका, एवढेच आमचे म्हणणे आहे. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशारा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. त्यावर अजित पवारांनी सोमवारी जाहीरपणे हा दम दिला.
या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत संघर्ष पु्न्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महायुतीत गेल्यानंतर मुस्लिम मतदार दुरावला असल्याने पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणेच नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात जात आहेत. फलटणमध्ये सोमवारी रामराजे नाईक-निंबाळकरांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत फडणवीसांवर हल्लाबोल करत तुतारी फुंकण्याचे संकेत दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परिषद सभापतिपदावरून पायउतार होत असताना अजित पवार, फडणवीसांनी रामराजे निंबाळकरांना पुन्हा सभापतिपदी विराजमान करण्याचा शब्द दिला होता. पण त्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे त्यांची नाराजी अधिक वाढली आहे.
अजित पवारांनी सोमवारी दुपारी रामराजे निंबाळकरांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यात त्यांनी रामराजे व त्यांच्या समर्थकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी माझ्या कार्यकर्त्याला कुणीही, काहीही बोललेलं चालणार नाही, असा सज्जड दम दिला. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनीही शिंदे, भाजपकडून सातत्याने सुरू असलेल्या टीकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. केंद्रातील भाजपच्या नेत्यांशी बोलून कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. रामराजेंच्या तुतारी वाजवू या वक्तव्याचे दोन अर्थ होतात, असा दावाही त्यांंनी केला.