---Advertisement---

वटवृक्ष देवस्थानचा स्थानिकांना दर्शन देण्याचा उपक्रम स्तुत्य

By team
On: January 23, 2025 10:22 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  :  प्रतिनिधी

अक्कलकोट वटवृक्ष मंदिर समितीने सकाळच्या सत्रामध्ये स्थानिकांना दर्शन देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. हा उपक्रम आम्ही पंढरपूरमध्ये देखील चांगल्या पद्धतीने राबवित आहोत त्यामुळे भाविक समाधान व्यक्त करत आहेत, असे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष सदगुरु ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. बुधवारी,औसेकर महाराजांनी येथील वटवृक्ष स्वामी मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

त्यानंतर मंदिरात झालेली कामे व मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.अलीकडच्या काळात वटवृक्ष स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी वाढत आहे.वाढती गर्दी ही प्रशासन असेल किंवा मंदिर समिती असेल यांना थोडी डोकेदुखी असते.परंतु अशाही स्थितीमध्ये स्थानिकांसह परगावच्या भाविकांना वेळेत दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे स्वतः रांगेमध्ये उभा राहून भाविकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामे चांगली झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.स्वर्गीय बाळासाहेब इंगळे यांनी देखील अशाच पद्धतीने चांगली स्वामी सेवा केली याचा आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी कोरोना काळापासून झालेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती त्यांना दिली.तसेच भविष्यातील प्रकल्पाबाबतही त्यांना माहिती दिली.

दिव्यांग तसेच वयोवृद्ध नागरिकांना स्वतंत्रपणे दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत.नवीन पादत्राणे स्टॅन्ड केला आहे.मुरलीधर मंदिराचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी सुसज्ज भक्त निवास उभे करत आहोत.या माध्यमातून भाविकांना दर्जेदार सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे,असे इंगळे यांनी सांगितले. याप्रसंगी वटवृक्ष देवस्थानच्यावतीने औसेकर महाराजांचा इंगळे यांनी स्वामी समर्थांचे कृपावस्त्र,प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.यावेळी ह.भ.प आबा महाराज कुरुनूरकर, प्रशांत गुरव,मोहन चव्हाण,
श्रीकांत मलवे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!