---Advertisement---

जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या; – नाना पटोले

By team
On: January 21, 2026 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करत राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी ठाम मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली. तसेच मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे काम सरकारकडून सुरू असून, भविष्यात मुंबई केंद्रशासित झाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

महानगरपालिकेच्या निवडणुकांवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला होता. याबाबत आम्ही आधीच निवडणूक आयोगाला सूचित केले होते. मतदानावेळी लावली जाणारी शाई कशी पुसली जाते, हे सर्वांनी पाहिले आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आता ईव्हीएमवर लोकांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे ‘मतदान करायला जायचेच कशाला?’ असा अविश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.

ईव्हीएमवरील अविश्वासामुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे आणि राज्य सरकारकडे केली आहे. तसेच मतदान प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव दिल्लीत बसलेल्या सरकारने सुरू केला आहे. उद्याच्या काळात जर मुंबई केंद्रशासित झाली, तर त्यात नावीन्य वाटायला नको. आर्टिकल ३ अंतर्गत केंद्र सरकारला अधिकार असले तरी महापालिका आपल्या ताब्यात घेऊन मुंबई वेगळी करण्याची दिशा सरकारने घेतली आहे. हा आरोप नसून वस्तुस्थिती आहे, असा दावा त्यांनी केला.

तसेच पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांना गुजराती भाषेत नोटिसा दिल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत पटोले म्हणाले की, एकीकडे मराठी भाषेला अविभाज्य दर्जा देण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे मराठी भाषेचा अपमान केला जात आहे. हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारे कृत्य आहे.

अहिल्याबाई होळकरांच्या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात हिंदू धोक्यात असल्याच्या वल्गना करणाऱ्या संघटनांनी यावर उत्तर द्यावे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेला तोडून महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण देशातील हिंदू समाजाचा अपमान मोदी व योगी सरकारने केला आहे. ही कॉंग्रेसची ठाम भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!