---Advertisement---

ग्रामपंचायतीसाठी ‘पंचम’ डिजिटल सोबती; व्हॉट्सअ‍ॅपवरून मिळणार घरबसल्या सरकारी माहिती !

By team
On: January 25, 2026 3:47 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

गावांमधील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ (Panchayat Assistance & Messaging Chatbot) हा विशेष व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या नव्या डिजिटल उपक्रमामुळे आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरून ग्रामपंचायतीशी संबंधित विविध कामे, दाखले तसेच शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘पंचम’ या चॅटबॉटची रचना केली असून तो ग्रामपंचायतींसाठी एक ‘डिजिटल सोबती’ म्हणून कार्य करणार आहे. दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करण्यासोबतच मार्गदर्शन व महत्त्वाची माहिती सोप्या स्वरूपात पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पंचम’च्या माध्यमातून केंद्र सरकार आणि देशभरातील ३० लाखांहून अधिक निवडून आलेले लोकप्रतिनिधी व पंचायत पदाधिकारी यांच्यात थेट डिजिटल संवाद साधला जाणार आहे.

ग्रामीण भागात व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यानेच ही सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. सामान्य चॅटिंगप्रमाणेच नागरिकांना माहिती मिळणार असल्याने ही सेवा वापरणे अत्यंत सोपे ठरणार आहे.

‘पंचम’ हा चॅटबॉट ई-ग्राम स्वराजशी संबंधित लाइव्ह डेटा तसेच पंचायत अधिकारी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे कार्य करतो. तो ई-ग्राम स्वराज, एलजीडी, जीपीडीपी तसेच मंत्रालयाच्या प्रमुख योजना व उपक्रमांशी संबंधित माहिती उपलब्ध करून देईल. सध्या हा चॅटबॉट आधीच फीड केलेल्या अधिकृत माहितीनुसार उत्तरे देणार असून ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार आहे.

या चॅटबॉटच्या माध्यमातून सामान्य नागरिक विविध दाखले, प्रमाणपत्रे, सरकारी योजना आणि ग्रामपंचायतीशी संबंधित महत्त्वाच्या कामांची माहिती घेऊ शकतील. तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी यांना योजना, सर्वेक्षणे, प्रशिक्षण साहित्य आणि मंत्रालयाच्या अधिकृत सूचनाही थेट उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण प्रशासनात डिजिटल क्रांतीला वेग मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!