होळीच्या रंगावरून आजीचा संताप; उकळते पाणी ओतून ४ वर्षीय नातू भाजला
कोराडी परिसरातील धक्कादायक घटना; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद, पोलिस तपास सुरू
नागपूर : प्रतिनिधी
होळीच्या उत्साहाला नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे गालबोट लागले आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडवला या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची खळबळजनक घटना नागपूरमधील कोराडी परिसरात घडली. या घटनेत चिमुकला सुमारे ४५ टक्के भाजला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी येथील रहिवासी ओम हरीश वांगे (वय ४) हा घराबाहेर पिचकारीने होळी खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे नेत होत्या. दरम्यान, खेळत असताना ओमने सहजपणे पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. या कारणावरून सिंधू ठाकरे यांचा संताप अनावर झाला.
रागाच्या भरात त्यांनी हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट नातवाच्या अंगावर ओतली. गरम पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने विव्हळू लागला आणि जोरजोरात ओरडू लागला. पाण्याचा चटका इतका तीव्र होता की, त्याचा कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजला आहे. मुलाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्य तात्काळ बाहेर धावून आले. जखमी ओमला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ओम सुमारे ४५ टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. ओमचे वडील वेकोलीमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये रागाच्या भरात आजीने उकळते पाणी ओतल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच त्यानंतर नातीच्या हातातील थंड पाण्याची बादली घेऊन तीही ओमवर ओतल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.