---Advertisement---

दहावीच्या परीक्षा केंद्रात विद्यार्थिनीवर हल्ला; गणिताच्या पेपरफुटीनेही खळबळ

By team
On: March 13, 2026 2:18 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला थेट परीक्षा हॉलमध्ये घुसून मारहाण केल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर मोठी खळबळ उडाली असून, सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. बीडसांगवी येथील शाळेतील विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देण्यासाठी या केंद्रावर आल्या होत्या. सकाळी सुमारे 10.45 वाजता सर्व विद्यार्थी आपापल्या जागी बसले असताना देसूर येथील एक तरुण अचानक परीक्षा हॉलमध्ये घुसला. हॉलमध्ये प्रवेश करताच त्या तरुणाने एका विद्यार्थिनीला लक्ष्य करत अचानक तिच्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परीक्षा केंद्रात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षा नियंत्रक आणि सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येण्याआधीच आरोपी तरुण तेथून पळून गेला.

या घटनेमुळे संबंधित विद्यार्थिनी प्रचंड घाबरली असून तिला परीक्षा केंद्रातच रडू कोसळले. तिने संपूर्ण प्रकार केंद्र संचालक आणि उपस्थित शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शाळा प्रशासनाने तत्काळ विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून घटनेची माहिती दिली. दरम्यान, राज्यभरात दहावीच्या परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असतानाही हल्लेखोर तरुण थेट परीक्षा हॉलपर्यंत पोहोचला कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधित तरुणाविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. गणित भाग–1 आणि गणित भाग–2 या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच टेलिग्रामवरील एका ग्रुपवर उपलब्ध झाल्याचे आढळून आले आहे.

पुणे विभागीय मंडळाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तपासणी करण्यात आली. तपासात ग्रुपवर फिरत असलेल्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 6 मार्च रोजी झालेल्या गणित भाग–1 चा पेपर 5 मार्च रोजी रात्री 8.37 वाजता टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आला होता. तर 9 मार्च रोजी झालेल्या गणित भाग–2 चा पेपर 6 मार्च रोजी सायंकाळी 4.56 वाजताच त्या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे दहावीच्या परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!