ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेकायदेशीर शुक्राणू व्यापाराचा भंडाफोड; दोघांविरोधात गुन्हा

परवानगी व वैद्यकीय पात्रता नसतानाही शुक्राणू साठवणूक व विक्री; एआरटी अधिनियम 2021 चे गंभीर उल्लंघन

मुंबई ;  वृत्तसंस्था

विरार परिसरात बेकायदेशीररित्या शुक्राणू साठवून त्याचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला विरारमधील पद्मीबाई टॉवर येथे असलेल्या ‘जीवदानी सायंटिफिक’ या कंपनीत बेकायदेशीररित्या शुक्राणूंची साठवणूक करून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

यानुसार आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी विशेष वैद्यकीय पथक तयार करून संबंधित ठिकाणी अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. 9 मार्च रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने पद्मीबाई टॉवरमधील ‘जीवदानी सायंटिफिक’ कंपनीवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान कंपनीत बेकायदेशीरपणे शुक्राणू साठवले जात असल्याचे उघड झाले.

तपासात ही कंपनी मयूर भागवत संखे आणि कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. संबंधित ठिकाणी कोणतीही वैद्यकीय पात्रता किंवा शासनाची आवश्यक परवानगी नसतानाही दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक केली जात असल्याचे आढळले. तसेच हे ठिकाण सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) अधिनियम 2021 अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणीकृत नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले.

पुढील तपासादरम्यान या ठिकाणी दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक करून त्यांचा बेकायदेशीर व्यापार केला जात असल्याचेही उघड झाले. हा प्रकार कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायावर प्रशासन कठोर कारवाई करत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याबाबतही तपास सुरू असून संबंधित यंत्रणा अधिक चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!