इस्लामाबाद : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी रात्री भीषण हवाई हल्ला झाल्याचा आरोप तालिबान सरकारने केला असून या हल्ल्यात सुमारे ४०० जणांचा मृत्यू तर २५० हून अधिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या घटनेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काबूल शहरातील दारुलअमान, अरजान किंमत, खैरखाना तसेच काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. या भागांवर पाकिस्तानी हवाई दल यांच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे.
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, या हल्ल्यात काबूलमधील एका व्यसनमुक्ती रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आले. त्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध करत हा “मानवतेविरुद्धचा गुन्हा” असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मोशर्रफ जैदी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काबूलमधील कोणत्याही रुग्णालयावर किंवा नागरी भागांवर हल्ला करण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंध अधिकच ताणले गेले असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीवर जगभरातील देशांचे लक्ष लागले असून पुढील घडामोडींवर सर्वांची नजर आहे.