ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन लहान चिमुकल्यांनी अक्कलकोटकरांना केले चकित; भगवद्गीतेचे ७०० श्लोक तोंडपाठ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या भगवद्गीतेचे अठरा अध्याय आणि तब्बल सातशे श्लोक तोंडपाठ सादर करून बार्शी येथील दोन चिमुकल्या बहिण-भावंडांनी अक्कलकोटकरांना अक्षरशः आश्चर्यचकित केले. स्वप्निल व सान्वी पाठक या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आयोजित कार्यक्रमात प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

मानवी जीवनाला दिशा देणारा प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्कलकोट येथील न.प. वरिष्ठ प्राथमिक सेंट्रल स्कूल व शहाजी हायस्कूलमध्ये या दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला.स्वप्निल व सान्वी हे बार्शी येथील नवीन प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी असून, इतक्या लहान वयात त्यांनी भगवद्गीता तोंडपाठ केल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार सचिन वायकुळे यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. त्यांच्या अभ्यासाची पद्धत, चिकाटी आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन यामुळे त्यांनी हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड,माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे, शिक्षण व क्रीडा संस्कृती सभापती अपर्णा सिद्धे, सोनाली शिंदे, सद्दाम शेरीकर,अविनाश मडीखांबे,रवी जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वप्निल व सान्वी यांचे पालक सतीश पाठक व पल्लवी पाठक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे व शिक्षण सभापती अपर्णा सिद्धे यांनी केले होते. यावेळी बोलताना दिलीप
सिद्धे म्हणाले, इयत्ता तिसरी-चौथीत असताना भगवद्गीता तोंडपाठ होणे ही साधी गोष्ट नाही. ही दैवी देणगी असून, ही मुले इतरांसाठी प्रेरणादायी आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम पुजारी यांनी मान्यवरांचे स्वागत करून शाल, पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार केला. प्रशासनाधिकारी सोमशेखर स्वामी यांनी प्रास्ताविक मांडले. तर ज्ञानोबा केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा सिद्धे यांनी आभार मानले. हा प्रेरणादायी उपक्रम अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूलमध्येही आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्याध्यापक आर.एस. पडळकर, बाबा निंबाळकर, पर्यवेक्षक वाय.पी. कबाडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.एस. बगले यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या चिमुकल्यांच्या यशाचे जोरदार स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!