ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दैवी शक्तीच्या नावाखाली अत्याचार? ‘अंकशास्त्रज्ञ’ खरात अटकेत; ५८ व्हिडिओंमुळे खळबळ

नाशिक : वृत्तसंस्था 

नाशिक शहरात तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात याला गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राचा आधार घेत महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये कॅनडा कॉर्नर परिसरात एका ३५ वर्षीय विवाहित महिलेची आरोपीशी ओळख झाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्याने मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी तिला कार्यालयात बोलावून तिच्यावर दबाव टाकण्यात आला. आरोपानुसार, गुंगीकारक पदार्थ देऊन आणि धमक्या देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

तीन वर्षे अत्याचार सहन केल्यानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. त्यामध्ये तब्बल ५८ व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली असून या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे. काही नामांकित व्यक्तींचा यात समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर तो अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याने त्याची प्रतिमा प्रभावी बनली होती. मात्र या गंभीर आरोपांनंतर त्याची प्रतिमा पूर्णपणे ढासळली आहे.

या घटनेमुळे धार्मिक आस्थेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समाजात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून संबंधितांवर टीका करत अशा व्यक्तींना पाठिंबा देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच महिला आयोगाशी संबंधित काही बाबींवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!