सोलापूर / प्रतिनिधी : मानवी जीवनात कृत्रिम बुध्दिमत्तेने क्रांती केली आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेची भिती न बाळगता कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करुन संवेदनशिल पत्रकारिता करावी. असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ उपेद्र कुलकर्णी यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अहिल्या भवन पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात सामाजिक शास्त्रे संकुलातील बी.ए. मिडिया आणि मास कम्युनिकेशनचे प्रा. विठ्ठल एडके यांच्या कृत्रिम बुध्दिमत्ता आणि पत्रकारिता ग्रंथाचे प्रकाशन शिक्षणतज्ञ डॉ. उपेंद्र कुलकर्णी, कुलगुरू डॉ. कर्नल प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाले, विद्यापीठातील भाषा विषयाच्या प्राध्यापकांनी कृत्रिम बुध्दिमतेचा वापर अध्यापनामध्ये करावा. एआय तंत्रज्ञानाला विरोध न करता ते कौशल्य म्हणून कसे आत्मसात करावे. असे स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. तर आभार डॉ. अनिल जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील प्रशासन अधिकारी, विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक मोठ्या संखेने उपस्थित होते.










