सोलापूर, प्रतिनिधी : आज सोलापूर जिल्हा नियोजन समिती सभागृहात उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठा योजना आणि आगामी रब्बी हंगामातील पाणी आवर्तनाचे नियोजन याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व पाणीपुरवठा योजनांना नियमानुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. उजनी धरणासह मध्यम व लघु प्रकल्पांमधील मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. महापालिका व नगरपालिकांनी शासन निर्णयानुसार १० टक्के पाणी बचतीचे काटेकोर नियोजन करावे. पाण्याची नासाडी रोखल्यास १० ते १५ टक्के पाणी बचत शक्य असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच नदी व कालव्यालगतच्या गावांना एक दिवसाआड सलग सहा तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांनी समन्वयाने नियोजन करावे. कालवा आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणी उपसा व कालवा फोडण्याचे प्रकार रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचनाही दिल्या.
उर्वरित रब्बी हंगामासाठी ४ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत एकूण ३७.६९ टीएमसी पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजना, कालवा प्रवाही सिंचन आणि भीमा-सीना जोड कालव्याच्या आवर्तनांचा समावेश आहे. तसेच भीमा नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर, धीरज साळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुणे व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, पाण्याची बचत आणि प्रत्येक गावापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवणे ही प्रशासनाची प्राथमिकता राहील.











