---Advertisement---

गोकुळच्या सत्तासंघर्षात सरकारची भूमिका योग्यच! तटकरे यांचे समर्थन

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करून त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी समर्थन केले आहे. गोकुळमध्ये कोरम पूर्ण होत नसल्याने पेच निर्माण झाला होता. हा पेच सोडवण्यासाठीच सरकारने संचालकांची संख्या वाढवून त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. या निर्णयाचा राजकीय अर्थ काढू नये, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

गोकुळमधील संचालक संख्या वाढवण्याच्या निर्णयावर बोलताना तटकरे म्हणाले की, या संस्था वेगवेगळ्या पद्धतीने नोंदणीकृत झालेल्या आहेत. मुख्यमंत्री यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. उद्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला १४ किंवा १५ जागा मिळाल्या असत्या, तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबतही तटकरे यांनी महत्त्वाचे विधान केले. प्रफुल्ल पटेल यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, विलिनीकरणाची चर्चा सध्या अजिबात सुरू नाही. ज्येष्ठ नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आमच्याकडूनही विलिनीकरणाचा विषय संपला असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

अजित पवार हयात असताना विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर विलिनीकरण होणार होते. आज दादा असते, तर विलिनीकरण झालेले पाहायला मिळाले असते, असेही तटकरे म्हणाले. मात्र, आता अजित पवार आपल्यात नसल्याने विलिनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाण्यात कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. देशासाठी शरद पवार यांचे गेल्या ६० वर्षांतील योगदान मोठे आहे. छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनीही त्यांची भेट घेतली असून, आपण सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवरून बोलून प्रकृतीची माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईला गेल्यानंतर रुग्णालयात किंवा घरी जाऊन पवार यांची भेट घेणार असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!